Jalna rainfall shortage pudhari photo
जालना

Jalna rainfall shortage : मुसळधार पावसाचा इशारा; शनिवारी कोरडी आभाळमाया

मुसळधार पाऊस केव्हा पडणार? शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

जालना : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जालना जिल्ह्यात खरीप पिके अक्षरशः धोक्यात आली आहेत. पावसाअभावी शेतजमिनीतील ओलावा संपला असून सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांची वाढ खुंटली आहे.

अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीत शनिवार(१२) व रविवार (१३) रोजी हवामान विभागाच्यावतीने जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र शनिवारी दिवसभर केवळ दाटून ढग आल्यानंतर पाऊस न पडल्याने आता रविवारी तरी पाऊस पडणार का? याकडे जिल्हावासीयांचे डोळे लागले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी या दोन दिवसांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात विशेषतः विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र त्यानंतर पावसाने दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उघडीप दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. अनेक भागांत जमिनीला भेगा पडल्या असून पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पावसाअभावी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

दरम्यान, पोळा सणही शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या सावटाखाली साजरा केला. जनावरांसाठीही पाण्याची टंचाई जाणवत असताना आता हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारचा दिवस कोरडा गेल्या नंतर रविवारी तरी पावसाचा अंदाज खरा ठरुन खरीप पिकांसाठी ‘जीवदान’देणारा ठरणार की पुन्हा एकदा अंदाज फोल ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.

आशा- निराशा

जालना जिल्ह्या‌त पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे ढग दाटुन आले आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६८ टक्के पाऊस पडला आहे.शनिवारी आकाशात गर्दी केलेल्या ढगांनी शेतकरी व नागरिकांची निराशा केल्यानंतर आता रविवारी तरी जोरदार पाऊस पडणार का याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT