Jalna Rain : तीन तास मुसळधार पाऊस, शहर जलमय file photo
जालना

Jalna Rain : तीन तास मुसळधार पाऊस, शहर जलमय

सखल भागात शिरले पाणी, सीना-कुंडलिका नद्या प्रवाहित, ठाकरे बंधारा ओव्हरफ्लो

पुढारी वृत्तसेवा

Jalna Rain: Heavy rain for three hours, city flooded

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरासह परिसरात गुरुवार, दि. ३० रोजी दुपारी साडे बारा ते तीन वाजेदरम्यान पडलेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहर जलमय झाले. कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे बंधारा ओव्हरफ्लो झाला तर कुंडलिका आणि सीना नद्या बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रवाहित झाल्या.

दरम्यान, तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला. सलग कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले, तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जुना जालना भागातील काही सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे त्यांचे जीवनावश्यक साहित्य भीजले. पावसामुळे शहरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने रस्त्यांवर पाणी आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी पाच वाजेपासून जालना शहरात भूरभूर पावसाला सुरुवात झाली होती. दुपारच्या सुमारास मात्र, पावसाचा जोर वाढला. शहरातील लक्ष्मीनारायणपुरा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, सरस्वती भुवन महाविद्यालय, मुर्गी वेस रोड आदींसह शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. शिवाय, सरस्वती भुवन प्रशालेसमोर रस्त्यावर नालीचे पाणी साचले होते. शाळकरी मुलांची पावसामुळे चांगली भंबेरी उडाली. जुना जालना कचेरी रोडवर अक्षरशः तलाव साचल्याचे चित्र पहायला मिळाले.

नाले सफाईकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

जुना जालना परिसरात नाले सफाईकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शहरातील जुना जालना भागात वेळेवर नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून नद्यांचे स्वरूप आले आहे. मनपाच्या या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT