जालना : शहरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका ड्रग्स डीलरला कदीम जालना पोलिसांनी सोमवारी (दि.8) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान रेल्वे स्थानक चौक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, शहरात वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालणाऱ्या जालना पोलिसांनी आता अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानक चौक परिसरातील मेरीट हॉटेल जवळ सापळा रचला. संशयित वाहन दिसून आल्यानंतर ते अडवून झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान वाहनातून 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्स डीलर अब्दुल जाफर शेख (45, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कदीम जालना पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत घातक मानले जाणारे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स जप्त केले आहे. या आंतरजिल्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य ड्रग्स डीलरला बेड्या ठोकल्या आहेत.
या धडक कारवाईमुळे जालना आणि संभाजीनगरमधील ड्रग्स माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी सापडल्याने “जालन्यात ड्रग्सचे मोठे जाळे सक्रिय आहे का?” असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हा ड्रग्स साठा जालन्यात कोणासाठी आणला होता? शहरातील कोणकोणते पांढरपेशा तरुण किंवा एजंट या रॅकेटमध्ये सामील आहेत? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. अटक करण्यात आलेला संभाजीनगरचा डीलर केवळ एक मोहरा असून, यामागे आंतरजिल्हा ड्रग्स माफियांची मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईमुळे पालकांत समाधानाचे वातावरण पसरले असून, येत्या काळात मोहिम असून तीव्र केली जाणार आहे.
एमडीची शहरात पहिलीच एन्ट्री!
आजवर मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित असलेले एमडी ड्रग्स आता जालन्यातही पाय पसरत असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थांची मोठी डील होणार असल्याची गुप्त माहिती कदीम जालना पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एमडी ड्रग्सचा साठा आढळून आला. पोलिसांनी ड्रग्ससह मुद्देमाल जप्त करत आरोपीला तत्काळ गजाआड केले.
तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांचे मिशन क्लीन
जप्त झालेल्या ड्रग्समुळे शहरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कॉलेज तरुण आणि नवोदितांना या नशेच्या जाळ्यात ओढण्याचा हा डाव तर नव्हता ना, या दृष्टीने पोलिस कसून चौकशी करत आहेत. ‘शहरातील अमली पदार्थांचे जाळे मुळासकट उखडून टाकू,”असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
जालना शहरात यापूर्वी गांजाची तस्करी तसेच नशेच्या गोळ्यांच्या वापराची प्रकरणे उघडकीस आली होती. मात्र, एमडी ड्रग्सचा साठा जप्त होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अंमलदार जनार्दन भाऊलाल शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 च्या कलम 22() आणि 8अन्वये कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.