जालना ः प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करताना मनपाचे पथक. pudhari photo
जालना

Jalna plastic ban drive : मनपाने केले दहा क्विंटल प्लास्टिक जप्त!

नवीन मोंढा परिसरातील दुकानांवर मारला छापा; दोषी व्यापाऱ्यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, शुक्रवार, दि. 27 रोजी शहरातील नवीन मोंढा परिसरात मोठी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकाने सुमारे 10 क्विंटल प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले असून, संबंधित दुकानदारांकडून 30,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांनी एकत्रितपणे नवीन मोंढा बाजारपेठेत ही शोधमोहीम राबवली. यामध्ये पारसमल मोहनलाल जैन, महालक्ष्मी ट्रेडर्स व इतर काही प्रतिष्ठानांकडे प्रतिबंधित प्लास्टिकचा मोठा साठा आढळून आला. शासनाने प्रतिबंधित केलेले सिंगल युज प्लास्टिक बाळगणे आणि त्याची विक्री करणे या कारणास्तव ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिनियम, 2016 मधील तरतुदींनुसार, 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅग्ज तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू वापरणे, बाळगणे आणि विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही बंदी घालण्यात आली असून, जालना महानगरपालिकेमार्फत यापुढेही अशी जप्तीची मोहीम अधिक कठोरपणे राबवण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई शहरातील सर्व व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही मोठी दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जालन्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
अर्जुन गिराम, अतिरिक्त आयुक्त, मनपा जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT