जालना ः जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 6 लाख 47 हजार 307 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यापैकी सुमारे 33 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी 1 लाख 62 हजार 162 क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासणार आहे. अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, सोयाबीन पिकासाठी खुल्या बाजारात जवळपास 60 हजार क्विंटल बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व इतर खाजगी कंपन्या यांच्याकडून उपलब्ध होईल. तसेच उर्वरित 1 लाख क्विंटल बियाणे शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे.
कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून 45 टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी 11 लाख 2 हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता असून दरवर्षी प्रमाणे चालू हंगामासाठी 13 लाखांपेक्षा जास्त कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध होणार आहेत. तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड 1 लाख 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, मागच्या खरीप हंगामात 6 लाख 25 हजार 501 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. जिल्ह्याचे एकूण सरासरी खरीप क्षेत्र 6 लाख 51 हजार 162 हेक्टर असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. जिल्ह्यात कापूस पिकाची सर्वाधिक 2 लाख 78 हजार 924 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून एकूण पेरणीतील त्याचा वाटा 44.58 टक्के आहे. त्याखालोखाल सोयाबीनची 2 लाख 12 हजार 404 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून त्याचा वाटा 33.96 टक्के इतका आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पेरणीपैकी तब्बल 78 टक्क्यांहून अधिक क्षेत्र कापूस आणि सोयाबीनने व्यापले आहे. भुईमूग 1 हजार 882 हेक्टर, सूर्यफूल 152 हेक्टर, तीळ 110 हेक्टर आणि करडई 15 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आले होते. यंदा 100 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
गत खरीप पेरणीची आकडेवारी
एकूण सरासरी क्षेत्र : 6,51,162.86 हेक्टर
एकूण पेरणी : 6,25,501.48 हेक्टर
कापूस : 2,78,924.28 हेक्टर (44.58%)
सोयाबीन : 2,12,404.86 हेक्टर (33.96%)
तूर : 50,849 हेक्टर (8.13%)
मका : 57,345 हेक्टर (9.17%)
कडधान्ये एकूण : 70,579.04 हेक्टर
तृणधान्ये एकूण : 61,109 हेक्टर
खताची टंचाई भासणार नाही खरीप हंगामासाठी 2 लाख 2 हजार मेट्रिक टन खताचा वापर होतो. खरीप हंगामासाठी 2 लाख 43 हजार 500 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या 1 लाख 24 हजार 932 मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी.गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.