Pardhad Walsawangi Accident Case Pudhari
जालना

Jalna Accident News | पारध-वालसावंगी मार्गावरील दुर्घटना; अखेर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दोन महिलांचा मृत्यू, दुचाकीस्वार जखमी

पुढारी वृत्तसेवा

Pardhad Walsawangi Accident Case

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध-वालसावंगी मार्गावर पद्मावती येथील सुनील कोलते यांच्या शेताजवळ ७ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातप्रकरणी अखेर कारचालकाविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार अरुण दामू शेवाळे (२५, रा. पद्मावती, ता. भोकरदन) जखमी झाले.

याप्रकरणी जखमी दुचाकीस्वार अरुण शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, कारचालक एमएच-२८ बीडी-७७११ क्रमांकाची कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी कारने शेवाळे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या विहिरीत जाऊन कोसळली.

कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत दोन्ही महिला धावडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन भुतेकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.

पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले की, दुचाकीस्वार अरुण शेवाळे यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास सुरू असून, तपासाअंती अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT