Paradh Budruk Bhokardan Dry Drought Pudhari
जालना

Jalna Drought | सोयाबीनला शेंगा, मक्याच्या कणसात दाणे नाहीत, कपाशीही शेतातच कोमेजली; दुष्काळाची दाहकता दिसू लागली

पारध बुद्रुकमध्ये शेतात पिके जळाली, मनात स्वप्ने करपली; मदतीच्या प्रतीक्षेत बळीराजा

पुढारी वृत्तसेवा

Paradh Budruk Bhokardan Dry Drought

सागर देशमुख

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक परिसरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके अक्षरशः करपून गेल्यासारखी झाली आहेत. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत हातातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता आणि हतबलता दिसून येत आहे.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारध बुद्रुक परिसरातील शेतांची पाहणी केली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी ए. एस. सोनुने, सहाय्यक कृषी अधिकारी नंदकिशोर पायघन, ग्रामपंचायत अधिकारी गजानन उंबरकर, ग्रामपंचायत अधिकारी ए. ए. वायाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

तसेच माजी उपसरपंच शेखर श्रीवास्तव, माजी उपसरपंच सुरेश आल्हाट, अनिल लोखंडे, दिलीप डोईफोडे, शिवाजी देशमुख, रमेश आल्हाट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

पावसाने दडी मारल्याने शेतातील परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाहीत, मक्याच्या कणसाला दाणे नाहीत आणि कपाशीही जागेवरच अक्षरशः श्वास तोडत आहे. पेरणीपासून मशागत, बियाणे, खत आणि औषधांवर केलेला खर्च आता पिकासोबतच वाया जाण्याची वेळ आली आहे.

ज्या शेतात हिरवेगार पीक डोलताना दिसायला हवे होते, त्याच शेतात आज करपलेली पिके आणि दुष्काळाची दाहकता दिसत आहे. कष्ट शेतकऱ्याचे, खर्च शेतकऱ्याचा आणि नुकसानही शेतकऱ्याचेच! या परिस्थितीने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

पाहणीचे दौरे सुरू; मदतीची मात्र प्रतीक्षा

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहेत. अधिकारी येतात, शेताची पाहणी करतात आणि परिस्थितीची नोंद घेतात; मात्र आता शेतकऱ्यांचा एकच सवाल आहे—या पाहणीचे पुढे काय?

शेतकऱ्यांना केवळ दौरे आणि पाहणी नको आहे. पिके करपल्यानंतर पंचनामे आणि पाहणी कितीही झाली, तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर तातडीने तोडगा निघणार नाही. त्यामुळे शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

“पंचनामे नकोत; सरसकट दुष्काळ जाहीर करा!”

पारध बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न दवडता, शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

“पाहणी नको, पंचनामे नकोत; आता सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करा!” अशी मागणी आता जोर धरत आहे.

दुष्काळाने शेतीचे अर्थकारण कोलमडले असताना शासन आर्थिक मदत कधी जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दररोज अधिकारी दौरे करत आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर केवळ दौऱ्यांमध्ये नाही, तर ठोस मदतीच्या निर्णयात आहे.

शेतकऱ्यांच्या जळालेल्या पिकांची पाहणी झाली; आता त्यांच्या जळालेल्या आशांना मदतीचा आधार कधी? हा सवाल पारध बुद्रुकमधील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT