

जालना : आगामी सण-उत्सवांच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने जालना मार्गे धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. नांदेड-हजरत निजामुद्दीन आणि जालना-छपरा या दोन मार्गांवर साप्ताहिक 'फेस्टिव्हल स्पेशल' गाड्या चालविण्यात येणार आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत धावणाऱ्या या गाड्यांमुळे दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.गाडी क्रमांक ०७६२१ नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे गाडीला जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट आणि मथुरा येथे थांबे असणार आहेत.
गाडी क्रमांक ०७६५१ जालना-छपरा विशेष रेल्वे ७ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दर बुधवारी धावणार असून, तिच्या चार फेऱ्या होतील. परतीची गाडी क्रमांक ०७६५२ छपरा-जालना ९ ते ३० ऑक्टोबरदरम्यान दर शुक्रवारी धावणार आहे. या गाडीच्याही चार फेऱ्या नियोजित आहेत.
या गाडीला छत्रपती संभाजीनगर, नागरसूल, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवाडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मेहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, विंध्याचल, वाराणसी, औंरीहार, गाझीपूर सिटी आणि बलिया येथे थांबे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
नांदेड-निजामुद्दीन गाडीच्या सात फेऱ्या
गाडी क्रमांक ०७६२१ नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर शनिवारी धावणार आहे. या गाडीच्या एकूण सात फेऱ्या होतील. परतीची गाडी क्रमांक ०७६२२ हजरत निजामुद्दीन-नांदेड १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी धावणार असून, तिच्याही सात फेऱ्या नियोजित आहेत.