Jalna News: Youth Dies After Suffering Electric Shock
अंबड, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील शिरनेर येथे रंगरंगोटीचे काम करणाऱ्या शुभम गणेश मूर्तडकर (वय २७) या तरुणाचा उच्च दाबाच्या विजेचा करंट लागून बुधवार (१) रोजी मृत्यु झाला.
अंबड शहरातील इंदिरा नगर येथील युवक शुभम गणेश मुर्तडकर हा रंगरंगोटीचे काम करण्यासाठी शिरनेर येथे चुलता संतोष मुर्तडकर व चुलत भावासोबत गेला होता. रंगरंगोटीचे काम करत असताना तो पहिल्या मजल्यावरील पॅरापेट वॉल ला रंग देत असताना तो अचानक घरा समोर आलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारा कडे त्यांचा हातातील लांब पाईप व ब्रशसह ओढल्या गेला.
त्यानंतर त्याला उच्च दाबाच्या विजेचा शॉक लागला. उपस्थित चुलते व चुलत भावाने त्याला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील यांनी त्यास तपासून मृत घोषित केले या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
घटनेचा पंचनामा पोलिस अंमलदार संदीप कुटे, हिरामण फलटणकर व अमर तोडकर यांनी केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत शुभम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच महिन्याची मुलगी, आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे.