Jalna News: Two arrested for planning murder-like crime
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील नळगल्ली भागात राहणाऱ्या दोन जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असताना त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने धारदार शस्त्रासह जेरबंद केले.
सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख शैलेश म्हस्के यांना खबऱ्याने माहिती दिली की, नळगल्ली येथे राहणारे दोन इसम हे जुन्या भांडणाच्या कारणावरून खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. यावरून पोउपनि म्हस्के यांनी सदरची माहिती पोलिस निरीक्षक संदीप भारती यांना देऊन त्यांच्या आदेशाने पोउपनि म्हस्के हे डीबी पथकासह सदर दोन इसमांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले.
इसमांना नळगल्ली भागातील भारत माता मंदिराच्या पाठीमागे त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून संदीप संतोष जाधव (रा.भारत माता मंदिर जवळ, नळगल्ली जालना व अमोल विश्वंबर गुंजकर (रा. लिंबी ता. घनसावंगी, जि. जालना) हे संशयित खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोउपनि म्हस्के यांनी पोलिस पथकासह संदीप जाधव याच्या घरी जाऊन दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली यावेळी अमोल विश्वंवर गुंजकर हा तेथे आल्याचे निदर्शनास आले.
त्याला येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावेळी घराची झडती घेतली असता अमोल गुंजकर याच्या ताब्यातून एक धारदार कुऱ्हाड व एक काळया रंगाचा धारदार चाकू मिळून आला. पंचासमक्ष तो जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, मागच्या वर्षी होळीच्या दिवशी संदीप जाधव यास एका तरुणाने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून त्या तरुणाचा खून करायचा होता असे त्याने सांगितले. पोलिसांनी संदीप जाधव यास याबाबत विचारले असता तो नूतनवसाहत येथे त्याच्या मित्राकडे राहत असल्याचे सांगण्यात आले. नूतन वसाहत येथून संदीप जाधव यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या घरातून एक धारदार तलवार मिळाली.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी. बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, जमादार जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, नजीर पटेल, पोलिस निरीक्षक भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, राहुल कटकम, धनंजय लोढे, चालक शिवाजी काळे आदींनी केली.