Jalna News : करातून महापालिकेला १०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य ! file photo
जालना

Jalna News : करातून महापालिकेला १०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य !

स्थायी समिती बैठकीत सहा विषयांवर चर्चा; स्वच्छता निविदा तीन दिवसांत पूर्ण करा

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Target of income of 100 crores to municipal corporation from tax!

जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरातील कर मूल्यनिर्धारणाचे काम गतीने पूर्ण करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कर मूल्यनिर्धारणासाठी नियुक्त एजन्सीच्या कामाचा आढावा घेताना शहरातील सुमारे ६ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती कर अधिकाऱ्यांनी दिली. तसेच शहरातील विविध भागांत सहा पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जालना महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समिती सभापती अशोक ऊर्फ लक्ष्मीकांत मनोहरराव पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एकूण सहा विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कर मूल्यनिर्धारणाच्या प्रगती अहवालाचा आढावा घेताना सभापती पांगारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर मूल्यनिर्धारणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेला प्राप्त होणारा निधी आणि त्या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांची पूर्वकल्पना स्थायी समितीला देण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना करण्यात आल्या. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण राहावे, यासाठी विभागनिहाय कामकाज आणि निधीबाबत पारदर्शकता ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

मागील नगरपालिका काळात मंजूर झालेल्या बी.ओ.टी. प्रस्तावांची सद्यस्थिती काय आहे, याचा सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक त्या भागांत नियमित धूर फवारणी (फॉगिंग) करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

बैठकीत स्थायी समितीचे सदस्य भास्कर आबा दानवे, अक्षय गोरंट्याल, महावीर ढक्का, अशोक पवार, महेश निकम यांच्यासह इतर सदस्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आपली भूमिका मांडली. महापालिकेचे संबंधित अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

स्वच्छता निविदा तीन दिवसांत पूर्ण करा

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रस्तावित स्वच्छता निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित उपायुक्तांना सभापती लक्ष्मीकांत पांगारकर यांनी दिले.

...तर शिस्तभंगाची कारवाई

स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार प्रत्येक विभागातील कामांचा प्रगती अहवाल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात स्थायी समिती सदस्यांना वेळेत सादर करणे बंधनकारक असल्याचे सभापती पांगारकर यांनी स्पष्ट केले. प्रगती अहवाल सादर करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT