Jalna News : लाठ्या, गोळ्या खाल्या; पण कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही file photo
जालना

Jalna News : लाठ्या, गोळ्या खाल्या; पण कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही

आंदोलनात रक्त सांडणाऱ्या महिलांच्या मनातील खदखद

पुढारी वृत्तसेवा

Jalna News : Sticks, bullets eaten; But Kunbi certificate was not received

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाचा मंडप आणि व्यासपीठ हटवल्या नंतर आता स्थानिक ग्रामस्थांच्या आणि आंदोलनात रक्त सांडणाऱ्या महिलांच्या मनातील खदखद उघडपणे बाहेर पडू लागली आहे.

"आम्ही रात्रंदिवस आंदोलनासाठी झटलो, अंगावर लाठ्या गोळ्या खाल्या, पण आमच्या गावात एकालाही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही; मग आमच्या त्या रक्ताचे काय झाले?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मंडप हटल्यामुळे दैनंदिन रहदारी मोकळी झाली असली, तरी आंदोलनाच्या मागील विविधांगी चर्चा गावात उघडपणे रंगू लागली आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात अगदी पहिल्या दिवसा पासून सक्रिय राहिलेल्या आणि त्यांचे चौथे उपोषण सोडवणाऱ्या ललिता तारख यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी गावाला खोटी आश्वासने देऊन माता-माऊल्यांना फसवले. महिलांचा केवळ भावनिक वापर करून घेतला.

मराठ्यांचे पंढरपूर म्हणवल्या जाणाऱ्या अंतरवाली सराटी त एका तरी व्यक्तीची कुणबी नोंद निघाली का? हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देण्याचे आश्वासन आम्हाला दिले होते, आम्ही दहा महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये अर्ज केला, पण हाती काहीच पडले नाही. यापूर्वी मंडप काढू नये म्हणून आम्ही स्वतः पोलिसांच्या अंगावर धावून गेलो होतो.

उपोषणाच्या सत्यते वर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्या पुढे म्हणाल्या, उपोषण केल्यानंतर सामान्य माणूस दोन दिवसही उभा राहू शकत नाही. तुमच्या उपोषणाची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तुम्ही कसे उपोषण केले, हे मी योग्य वेळ आल्यावर उघड करेन. उपोषण स्थळावरून अर्वाच्य भाषा वापरणे योग्य नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज १८ पगड जातींना सोबत घेऊन चालले होते, मात्र येथे शासकीय अधिकाऱ्यां बद्दल वापरलेली भाषा चुकीची होती.

"आंदोलनात लाठीमार सहन करणाऱ्या ज्येष्ठ महिला गंगूबाई तारख यांनी आपली विदारक व्यथा मांडताना सांगितले, "जे झाले ते चांगल्यासाठीच झाले, बरे झाले हा मंडप एकदाचा निघाला. आंदोलनात लाठ्या खाण्यासाठी आम्ही आणि फायदा गोळा करायला पाटील ! आमच्या एकाही तारखाची कुणबी नोंद निघाली नाही. आम्ही दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जात होतो, ती रोजंदारी ही बुडाली. मी पाच दिवस उपोषणाला बसले होते, अंगावर गोळी लागली, जखमा झाल्या. मग या सांडलेल्या रक्ताचे काय झाले? आरक्षण मिळाले नाही अन् प्रमाणपत्रही मिळाले नाही.

"वैद्यकीय उपचारा तील भेद भावावर बोलताना त्या म्हणाल्या, आम्हाला मार लागला तेव्हा आम्हाला सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि नेते मात्र छत्रपती संभाजीनगर च्या आलिशान खाजगी रुग्णालयात गेले. आता आमच्या अंगातील ताकद गेली, डोळ्यांनी दिसेनासे झाले आणि लोकांचे देणे देऊन आम्ही कर्जबाजारी झालो. आमच्या लेकरां चे भले होण्याऐवजी वाटोळेच झाले. असेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT