smart meter Pudhari
जालना

Smart Meters : स्मार्ट वीज मीटर ग्राहकांना ८६ लाख ७५ हजारांची सवलत

जालना मंडळात ५९ हजार २१९ ग्राहकांना लाभ, सकाळी ९ ते ५ सवलत लागू

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Smart electricity meter consumers get a concession of ₹86.75 lakh

जालना, पुढारी वृत्तसेवा: आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळत आहे. शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे. जालना मंडलातील 59 हजार 219 ग्राहकांना 86 लाख 75 हजार रुपये सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. घरगुती ग्राहकांना २०२५ च्या जुलै महिन्यापासून सवलत मिळत आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली. जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे प्रतियुनिट सवलत ग्राहकांना मिळात आहे. यंदा ही सवलत ८५ पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षात ती वाढत जाणार आहे.

जालना मंडलातील ५९हजार २१९ ग्राहकांना ८६ लाख ७५ हजार रुपये सवलत मिळाली. नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळत आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही.

सवलतीचा लाभ घ्या

दिवसा वीजवापराची सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे तसेच अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT