Jalna News : राजेगावात विद्युत खांब अन् तारांना संरक्षणात्मक कव्हर file photo
जालना

Jalna News : राजेगावात विद्युत खांब अन् तारांना संरक्षणात्मक कव्हर

ग्रामपंचायतर्फे पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

Jalna News : Protective cover for electric poles and wires in Rajegaon

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राजेगाव (ता. घनसावंगी) ग्रामपंचायतीने गावातील १९ ठिकाणी लोखंडी विद्युत खांब तसेच विद्युत तारांना संरक्षणात्मक कव्हर बसविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य विद्युत धोक्यांचा विचार करून करण्यात आलेल्या या उपाययोजनेचे गावकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

पावसाळ्यात सततचा पाऊस, ओलावा व पाणी साचल्यामुळे लोखंडी विद्युत खांबांमध्ये वीज प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी खेळणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने अपघात घडण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील संभाव्य धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर १९ ठिकाणी लोखंडी विद्युत खांब व विद्युत तारांवर शेततळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मजबूत पन्नीचे संरक्षणात्मक कव्हर बसविण्यात आले. या उपायामुळे पावसाळ्यात विद्युत प्रवाहाचा धोका कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेत मोलाची भर पडणार आहे.

ग्रामपंचायतीच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, सुरक्षिततेबाबत प्रशासनाची संवेदनशील भूमिका अधोरेखित झाली आहे.

"सुरक्षित गाव - सजग नागरिक" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा राजेगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही निश्चितच आदर्श ठरणारा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सुरक्षित अंतर राखा

पावसाळ्यात नागरिकांनी विद्युत खांब, तुटलेल्या विद्युत तारा तसेच इतर विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे. कुठेही विद्युत धोक्याची शक्यता आढळल्यास तत्काळ महावितरण किंवा ग्रामपंचायतीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT