Jalna News: Municipality cleans underground sewers using jet machines
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा शहरातील हबीब कॉलनी, नूतन कॉलनी व अनिसा मस्जिद परिसरातील भूमिगत गटारी तुंबल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक अब्दुल कदीर यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावठा केला होता. जेट मशीनद्वारे भूमिगत गटारी सफाई करण्यात आली.
या पाठपुराव्याची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा समरीन नाज मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी गजानन तायडे, नगर अभियंता अजय व्यवहारे, स्वच्छता निरीक्षक संदीप वानखडे तसेच मुकरदम शाकेर शेख यांच्या समन्वयातून नगर परिषद भोकरदनमार्फत संबंधित परिसरातील भूमिगत गटारींची जेट मशीनद्वारे तत्काळ साफसफाई करण्यात आली.
या मोहिमेमुळे तुंबलेल्या गटारी मोकळ्या होऊन सांडपाण्याचा निचरा सुरळीत झाला असून परिसरातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे भोकरदन शहरातील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
देखभालीची गरज
प्रभागाच्या नगरसेविका शीला भारती यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारची नियमित साफसफाई व देखभाल सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातही शहरातील भूमिगत गटारींची वेळोवेळी जेट मशीनद्वारे साफसफाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.