पारध, सागर देशमुख : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सुमारे ₹१० ते ₹११ लाखांचा खर्च करून उभारण्यात आलेले वॉल कंपाऊंड व 'महाराजा गेट' आज निकृष्ट दर्जाच्या कामाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारलेले हे गेट दोन वेळा मलमपट्टी (दुरुस्ती) करूनही पुन्हा निकामी झाले असून, अनेक महिने उलटूनही नवीन गेट बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
विशेष म्हणजे, महाराजा गेट व वॉल कंपाऊंडचे काम ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शाळेचे गेट उभारण्यासाठी तब्बल दोन ते तीन महिने लागले. मात्र, गेटच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने गेट प्रथमच कोसळले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर केवळ वरवरची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच गेट पुन्हा जमीनदोस्त झाले. त्यानंतर पुन्हा मलमपट्टी करण्यात आली; परंतु तीही निष्फळ ठरली. आजही शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षित गेट नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.
गेट कोसळले तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांसह शाळेचे गेट उघडत होते. अचानक लोखंडी गेट शिक्षकांच्या अंगावर कोसळले. सुदैवाने शिक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवितहानीची शक्यता नाकारता आली नसती.
गेट नसल्यामुळे शाळेच्या परिसरात मोकाट बकऱ्या, कोंबड्या, कुत्री व इतर जनावरे मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे वर्गात सुरू असलेल्या अध्यापनात अडथळे निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे लक्ष वारंवार विचलित होत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली. याचाच गैरफायदा घेत शाळा सुटल्यानंतर काही टवाळखोर शाळेच्या परिसरात धूम्रपान व मद्यपान करत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, बीडी व सिगारेटचे थोटके आढळत असल्याने शाळेच्या पवित्र वातावरणालाच गालबोट लागले आहे.
दरम्यान, शाळेच्या प्रांगणातील इंटरलॉकिंग ब्लॉकचे कामही अर्धवट अवस्थेत पडून आहे. विखुरलेल्या ब्लॉकमुळे विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाळ्यात येथे पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. ग्रामीण भागात आधीच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल असताना, जिल्हा परिषद शाळांमधील अशा निकृष्ट कामांमुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
◼️ लाखोंचा निधी गेला कुठे?
₹१०–११ लाखांचा निधी खर्च होऊनही गेट दोनदा कसे कोसळले? ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम निकृष्ट दर्जाचे कसे ठरले? दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
◼️ ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
महाराजा गेट व वॉल कंपाऊंडच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी.
ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामातील जबाबदारी निश्चित करावी.
दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
शाळेसाठी तातडीने नवीन व सुरक्षित गेट उभारावे.
अपूर्ण इंटरलॉकिंगचे काम त्वरित पूर्ण करावे.
शाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था करून टवाळखोर व मोकाट जनावरांना प्रतिबंध करावा.
◼️ शिक्षक नेते तथा माजी मुख्याध्यापक अजर पठाण यांची प्रतिक्रिया
"जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. अशा शाळेत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले महाराजा गेट दोन वेळा कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही केवळ निकृष्ट कामाची बाब नसून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करणारी घटना आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी तातडीने दर्जेदार व सुरक्षित नवीन गेट उभारून अपूर्ण कामे पूर्ण करणे आवश्यक आहे."
◼️ श्री. वाळके, गट शिक्षण अधिकारी
"पारध बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या महाराजा गेट प्रकरणाची वस्तुनिष्ठ व पारदर्शक चौकशी करण्यासाठी संबंधित अभियंत्याला तातडीने घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थितीच्या आधारे आवश्यक कार्यवाही केली जाईल. चौकशीत निकृष्ट दर्जाचे काम अथवा हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही."
◼️ परमेश्वर पाटील लोखंडे, माजी पंचायत समिती सभापती
"₹१०–११ लाखांचा निधी खर्चूनही महाराजा गेट दोनदा कोसळणे म्हणजे भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा कळस आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून नवीन सुरक्षित गेट उभारावे. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल."