Jalna News: Larvae infestation on tur
वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या तूर पिकाने पिवळया फुलांचा शालू पांघरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी ढगाळ, दमट तर कधी हवामान थंड होत असल्यामुळे बदललेल्या वातावरणामुळे तूर पिकावर कळ्या खाणाऱ्या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेच्या या शेवटच्या पिकालाच मोठा धोका निर्माण झाला आहे.
अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. तूर पिकाची चांगली वाढ पाहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. तूर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांनाच वातावरणातील बदलामुळे तुरीवर आळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
तुरीची झाडे पिवळ्या फुलांनी बहरली असतांनाच आळ्यांमुळे उत्पादन हातचे जाण्याची भिती आहे. कपाशी व सोयाबीन पिकाच्या नुकसानीनंतर तुरी वर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. सोयाबीन पिकाला झडती न आल्यानें उत्पादन कमी झाले तसेच बाजारात भावही कमी मिळाला. त्यातच तूर पिकालाही कीड व प्रतिकूल हवामानाचा फटका बसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
यंदा अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनसोबत आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली आहे. तूर पिकाचा लागवड खर्च कमी असून भाव चांगला मिळत असल्याने हा पेरा वाढला होता. मात्र कपाशीवरील फवारणीचा दुष्परिणाम तुरीवरही होत असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. काही ठिकाणी चार ओळी तूर आणि चार ओळी कपाशी असा आंतरपीक प्रयोग करण्यात आला आहे.
सतत होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे तसेच कधी ढगाळ तर कधी थंड व दमट वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रोगराई वाढत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करावी. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून तूर पिकाची काळजी घ्यावी जेणे करून उत्पादन घटणार नाही.-संकेत डावरे, कृषी सहायक अधिकारी अंबड