Jalna News: Farmers unhappy over sugarcane prices
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कारखाने ही भरपूर आहेत. परंतू ऊसाला भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बाजारात साखरेचे भाव तेजीत असल्याचे दिसून येत आहे. ऊसाला ४ हजार २०० रूपये टनाप्रमाणे भाव देण्याची मागणी होत आहे.
वडीगोद्री परिसरात विविध कारखान्याच्या तब्बल दहा ते पंधरा ऊस तोडण्यासाठी टोळ्यात येतात. या भागात समृद्धी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, जय भवानी गेवराई, गंगामैया शेवगाव, संत ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा, दौंड शुगर दौंड, वांबोरी, प्रवरा साखर कारखाना मुळा, छत्रपती संभाजी राजे चिते पिंपळगाव, बारामती अॅग्रो चा कन्नड, ओंकार शुगर भोकरदन, रेणुका शुगर विहामांडवा, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना बोधेगाव, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मढी ईत्यादी साखर कारखान्यांनी वडीगोद्री परिसरामध्ये बस्तान मांडवले आहे.
पश्चितम महाराष्ट्रत नुकत्याच झालेल्या आंदोलनामुळे ४४०० रूपयाचा दर जाहिर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील उसाला भाव देण्यात यावा. ऊस पिक घेणे म्हणजे त्याला पोटच्या लेकरासारखे वर्षभर सांभाळावे लागते, खताच्या भावाने गाठलेला हिमालयाचा डोंगर, तन नाशकच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ त्याचबरोबर मजुरांची अडचण लावणीपासून ते कारखान्याला घालेपर्यंत शेतकऱ्याला पाण्यासारखे पैसे ऊस पिक घेण्यासाठी पैसे द्यावे लागते, एक एकर क्षेसासाठी जवळपास पन्नास हजार रूपये खर्च येतो. त्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात निसर्ग साथ देत नसल्याने उत्पन्नात घट होत आहे.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी जागृत नसल्याने कारखानादाराकडून लूट केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांनी एकत्र आल्यास ऊसाला चांगला भाव मिळेल. शेतकरी एकत्र आल्यास भविष्यात लढा उभारला जाईल.- बळीराम खटके, ओबीसी नेते
जिल्ह्यात ऊसाला २९०० रूपये दर मिळत आहे. शेतकरी संघटित नसल्याने भाव मिळत आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकरी यांनी संघटित होऊन साखर सम्राटाच्या विरोधात लढल्यास चांगला दर मिळेल. बाजारात साखर ६ हजार रूपये प्रति क्विंटलने विकली जात आहे. त्या तुलनेत ऊसा का भाव मिळत नाही. -सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना