Jalna News : रस्त्यासाठी बैलजोडीसह शेतकरी कुटुंबाचा ठिय्या  file photo
जालना

Jalna News : रस्त्यासाठी बैलजोडीसह शेतकरी कुटुंबाचा ठिय्या

दोन महिन्यांपासून आदेशाची अंमलबजावणी नाही!; कुटुंबाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Farmer family with a pair of bullocks protest demanding provision of road to reach the farm

परतूर, पुढारी वृत्तसेवा: परतूर तालुक्यातील कोरेगाव येथील एका शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चक्क सहकुटुंब आणि बैलजोडीसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, तहसीलदारांनी दोन महिन्यांपूर्वीच संबंधित रस्ता खुला करण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्याने केला आहे. खरीप हंगामातील पेरणी सुरू असताना हा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

परतूर तालुक्यातील मौजे कोरेगाव येथील शेतकरी नितीन मारोती शिंदे यांची गट क्रमांक २१२ व २१३ मध्ये सुमारे सहा एकर शेती आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता अनेक दिवसांपासून बंद असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. याप्रकरणी परतूर तहसीलदारांनी २७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अद्याप आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणीचा महत्त्वाचा कालावधी सुरू असून, रस्त्याअभावी शेतात जाता येत नसल्याने पेरणी रखडली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करत नितीन शिंदे यांनी कुटुंबीयांसह आणि बैलजोडीसह शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. जो पर्यंत निर्णय लागत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांने घेतला आहे.

'एसडीएम' सोबत चर्चा

दरम्यान, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्याशी चर्चा केली. रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात रस्ता खुला होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार नितीन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT