Jalna News: District faces a serious threat of fodder shortage
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे दुष्काळाच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आगामी काही दिवसांत ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गाय, म्हैस, वासरे, शेळी, मेंढी आदी ६ लाख ३२ हजार ९१४ पशुधनाची संख्या आहे. एवढ्या पशुधनासाठी दररोज ७ हजार ३८०.०९ मे.टन हिरवा तर २ हजार ३७४.१५ मे. टन वाळलेला चारा लागतो. सद्यःस्थिती जिल्ह्यात ६० ते ६६ दिवस पुरेल, एवढा चारा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी ओसाड पडलेले शेतशिवार, कोरड्या पडलेल्या विहिरी, आटलेल्या नद्या, तलाव दुष्काळाची दाहकता दर्शवीत आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे त्यांना चारा लागवडीसाठी बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. त्यातून दीड लाख मे. टन चारा उत्पादन अपेक्षीत असल्याचे नियोजन आहे. दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता पशुसंवर्धन विभागाने जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर आठ असे टंचाई निवारण वॉर रूम स्थापन करून त्यात नियुक्त्या केल्या आहे.
जिल्ह्यात २०१२ जिल्हावासियांनी भिषण दुष्काळ अनुभवला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता अधिक तिव्र होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एकीकडे माणसांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे पशुधन सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात सध्या दोन महिने पुरेल, एवढा चारा उपलब्ध आहे. त्यानंतर चारा लागवडीतून पशुधनाची भूक भागविण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आगामी काही दिवसात याबाबत उपाययोजना केली जाणार आहे.
तालुकानिहाय पशुधनाची संख्या
अंबड - ९८ हजार ०३४, बदनापूर - ४५ हजार २८३, भोकरदन - १४ हजार ३९७, जाफराबाद -७४ हजार ९१, जालना- ६९ हजार १४७, घनसावंगी - २६ हजार ९८१, मंठा ५७ हजार १२१, परतूर - ५१ हजार ८६१ अशी जिल्ह्यांत एकूण - ६ लाख ३२ हजार ९१४ पशुधन आहे.