जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामीण रुग्णालय, परतूर येथे गुरुवार, दि. २२ रोजी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे तसेच काही आरोग्य कक्ष बंद असल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची चांगलीच झाडाझडती घेतली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, औषध वितरण कक्ष तसेच संपूर्ण परिसरात फिरून पाहणी केली. कर्तव्याच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे तसेच काही कक्ष बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घेत गैरहजर वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रुग्णांना सेवा देण्याचे आदेश दिले.
रुग्णसेवेत हयगय खपवून घेतली जाणार नाही
रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट ताकीद जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील सर्व कक्ष ठरवून दिलेल्या वेळेत नियमितपणे सुरू ठेवावेत, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, रुग्णांना तत्पर व दर्जेदार सेवा द्यावी तसेच परिसराची स्वच्छता राखावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.