Jalna News: Disciplinary action taken against the Gram Sevak
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील ग्रामपंचायतीच्या गावात नियोजित ग्रामसभेची माहिती नागरिकांना वेळेत न दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभेची पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना, ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ग्रामसेवकावर ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी नुकतेच पत्र काढून ही कारवाई केली आहे.
आन्वा ग्रामसभेबाबत तक्रार केल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने याबाबत चौकशी केली. यावेळी ग्रामसभेची तारीख, वेळ व विषयांची माहिती फलकावर लावण्यात आली नसल्याचे तसेच नागरिकांना सूचित करण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले. या निष्काळजी पणामुळे ग्रामसभेला अपेक्षित उपस्थिती राहिली नाही आणि ग्रामस्थांच्या सहभागावर परिणाम झाला.
प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली असून, प्राथमिक टप्प्यात लेखी तंबी देण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास अधिक कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामसभेची माहिती पारदर्शकपणे व वेळेत देणे ही ग्रामसेवकांची मूलभूत जबाबदारी असल्याचे म्हंटले आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई
दिपक सर्जेराव सोनूने यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत आन्वा कार्लावाडी येथील २ ऑक्टोंबर २०२५ रोजीची ग्रामसभेचा अहवाल गटविकास अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारीची छायांकित प्रत देण्यात येत असून त्यामध्ये नमूद प्रमाणे चौकशी करून चौकशीचा अहवाल कार्यालयात सादर करावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.