Jalna News: Action taken against rickshaws due to traffic congestion
जालना, पुढारी वृत्तसेवाः येथील बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली
जालना बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी टाळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरा वाहतूक पोलिसांनी ऑटो रिक्षांवर कारवाई केली. बसस्थानकाबाहेर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या व रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ऑटो रिक्षाचालकांनी मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
बसस्थानक परिसरात रिक्षांच्या अनधिकृत पार्किंगमुळे प्रवासी वाहतूक बाधित होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते. यासोबतच जालना बसस्थानकांच्या आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन बसस्थानक परिसरात नो पार्किंगचे स्पष्ट फलक तत्काळ बसविण्याबाबत निर्देश पोलिसांच्या वतीने देण्यात आले. बसस्थानकाच्या हद्दीत किंवा मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा उभ्या राहू नयेत याबाबतही त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सुधारणा होणार का?
जालना शहरातील बसस्थानकासह समोरील रस्त्यावर अनेक रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करतात. काही रिक्षा चालक सरळ बसस्थानकात घुसून बससमोर रिक्षा लावून प्रवासी भरत असल्याचे चित्र अनेकदा पहावयास मिळते. पोलिसांच्या कारवाईनंतर सुधारणा होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.