Jalna News Accused possessing country-made pistol arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा: सदर बाजार पोलिसांनी विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (२३) जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील किराणा दुकानाजवळ एक संशयित इसम बेकायदेशीर शस्त्रासह फिरत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. माहितीची आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईत कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे (रा. पानेवाडी, ता. घनसावंगी, जि. जालना, सध्या रा. गांधीनगर, जालना) याला ताब्यात या घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी धातूपासून बनविलेला देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक मॅगझिन आढळून आले. संबंधित शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याने पोलिसांनी ते जप्त केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.