Jalna News: Accident involving a tractor and a Tata Maximo on the Jafrabad-Mahora road
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद-माहोरा रस्त्यावरील शिवम् बिअर बारसमोर रविवारी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅक्सिमो वाहनाला भोकरदनकडून येणाऱ्या उसाच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अंदाजे १५ ते १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना पालकांनी तातडीने जालना, छत्रपती संभाजीनगर व सिल्लोड येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे.
चिंचखेडा येथील टाटा मॅक्सिमो (क्र. एमएच ४६ डब्ल्यू ११४५) या वाहनातून विद्यार्थी म्हसला येथील शाळेत जात होते. यावेळी, शिवम् बिअर बारसमोर मॅक्सिमो वाहन रस्त्याच्या कडेला उभे करुन वाहनचालक एका विद्यार्थिनीला आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेले. यावेळी भोकरदनकडून ऊस रिकामा करुन ट्रॅक्टर (क्र. एमएच २० जीई ५१५३) भरधाव वेगाने आले. यावेळी उभ्या असलेल्या मॅक्सिमो वाहनाला जोराची धडक दिली. अपघातानंतर, टाटा मॅक्सिमो वाहन उलटले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी पोहोचून आपल्या पाल्यांना तातडीने विविध रुग्णालयांत उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे जाफराबाद-माहोरा परिसरात एकच खळबळ उडाली असून शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे-विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची क्षमता, सुरक्षितता तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबत संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होता आहे.
जखमींची अधिकृत संख्या अद्याप अस्पष्ट
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. बातमी देण्यापर्यंत जाफराबाद पोलीस ठाण्यात या अपघातासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती आहे.