Jalna News : 84 thousand 227 women 'millionaires' in the district
संघपाल वाहूळकर
जालना : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'लखपती दीदी' योजनेला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार २२७ महिला वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न गटात पोहोचल्या आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगार उपक्रमांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीनुसार जालना तालुका १४ हजार ९९० महिलांसह प्रथम क्रमांकावर असून भोकरदन तालुका १४ हजार ३२९ महिलांसह दुसऱ्या स्थानावर आहे अंबड तालुक्यात १३ हजार ४६ महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत.
घनसावंगी तालुक्यात ११ हजार ९७, जाफराबादमध्ये ८ हजार ५३, बदनापूरमध्ये ८ हजार ३७, मंठा तालुक्यात ७ हजार ७५८ तर परतूर तालुक्यात ६ हजार ९१७ महिलांनी वार्षिक उत्पन्नाचा एक लाखांचा टप्पा गाठला आहे. महिला बचत गटांमार्फत शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, घरगुती उद्योग, शिवणकाम, मसाला निर्मिती, खाद्यप्रक्रिया, हस्तकला तसेच लघुउद्योग उभारणीला प्रोत्साहन दिले जात आहे. शासनाच्या विविध योजनांची जोड, प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीमुळे ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत असून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. कुटुंबाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
लखपती दीदी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळाली आहे. स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, बचत, उद्योग प्रशिक्षण व आर्थिक स्वावलंबन मिळत आहे. शासनाने दिलेले प्रशिक्षण, बँक कर्ज सुविधा आणि बाजारपेठ उपलब्धतेमुळे महिला उद्योजक तयार होत आहेत. सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी आहे.-शैलेष चौधरी, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद
महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत
उमेदच्या 'लखपती दीदी' अभियानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जालना जिल्हा पुढचे पाऊल टाकीत असल्याचे दिसून येत आहे.