जालना ः गोंदेगाव शिवारात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. यावेळी घटनास्थळी पाहणी करताना तालुका जालना पोलिस ठाण्याचे पथक. घटनास्थळी दुचाकी देखील उभी होती. pudhari photo
जालना

Jalna Crime : सासूच्या अंत्यविधीला आलेल्या जावयाची दगडाने ठेचून हत्या

गोंदेगाव शिवारातील घटना; परिसरात खळबळ, जुन्या वादातून घातपाताचा संशय

पुढारी वृत्तसेवा

जालना :सासूच्या अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात सोमवार दि. 27 रोजी उघडकीस आली. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. मच्छिंद्र दराडे (55, रा. पानेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दराडे हे आपल्या नातेवाईकाकडे (सासूच्या) अंत्यविधीसाठी गोंदेगाव येथे आले होते. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. सासूला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या दराडे यांचाच अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने ठेचून जीव घेतला. हल्लेखोरांनी दराडे यांना गाठून त्यांच्यावर दगडाने भीषण प्रहार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, मच्छिंद्र दराडे यांचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी गोंदेगाव शिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जालना शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून पुराव्यांची जमवाजमव सुरू केली आहे.

मच्छिंद्र दराडे यांची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली की काय याचा शोध पोलिस घेत आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली आहेत. अंत्यविधीच्या दुःखात असतानाच पाहुण्या जावयाची अशी हत्या झाल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. मृत मच्छिंद्र दराडे यांचा मुलगा पवन मच्छिंद्र दराडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन संशयितांना घेतले ताब्यात

आईवरून शिविगाळ केली म्हणून हा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी दारुच्या बाटल्या, दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT