Murder on suspicion of immoral relationship
मंठा, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील केंधळी शिवारात असलेल्या विजयलक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या कारखान्याजवळ अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका जणांचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मंठा तालुक्यातील केंधळी शिवारात विश्वलक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज नावाचा सिमेंटचे ब्लॉक बनविण्याचा कारखाना आहे. या कारख्यान्याजवळ जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथील रहिवासी असलेले निवृत्ती सवडे (रा. नांदखेडा, जाफराबाद) आणि मेहुणा गणेश समाधान अंभोरे हे आपल्या कुटुंबासह राहतात.
सवडे याच्यासह त्याच्या मेहुण्याने अनैतिक संबंधाच्या संशयातून त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या श्रीपाद स्वामी (५५) या एकट्या रा-हणाऱ्या व्यक्तीस शुक्रवारी रात्री लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण केली होती.
त्यानंतर निवृत्ती सवडे व त्यांचा मेहुणा गणेश समाधान अंभोरे यांनी स्वामी यास जालना येथी जिल्हा रुग्णालयात परस्पर दाखल केले होते. उपचारादरम्यान स्वामी याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी परतूर व मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या गुन्ह्याचा तपास लावला.
सवडे आणि त्याच्या मेहुण्याने स्वामींच्या मृत्यू कशामुळे झाला ? याचे कारण दडपून ठेवले होते. दरम्यान, परतूरचे पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, मंठा पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक रावते, नंदू खंदारे, गजानन राठोड, किरण मोरे, प्रशांत काळे, कोरड यांनी आरोपींचा दोन तासात शोध लावला.