Arrest Pudhari
जालना

Jalna murder case : जालना खून प्रकरण काही तासांत दोघांना बेड्या

पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची झडप

पुढारी वृत्तसेवा

Jalna murder case: Two arrested within hours

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावर शुक्रवारी रात्री गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहर हादरले असतानाच, जालना पोलिसांनी जबरदस्त तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. घाटी हॉस्पिटल ते सत्कार कॉम्प्लेक्स रोड परिसरात चरण प्रल्हाद रायमल (वय २७, रा. शनी मंदिराजवळ, जालना) या तरुणावर आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चरणला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी कदीम जालना, सदर बाजार, चंदनझिरा आणि स्थानिक गुन्हे शाखा अशी एकूण ६ विशेष पथके तैनात करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित आरोपी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अमन शैलेंद्र ढिल्लोड आणि अजय विजय अमलेकर यांना शिताफीने ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

५ दिवसांची कोठडी

शनिवारी (दि. २४) दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT