शहराच्या आरोग्य व्यवस्थेला पालिकेचे बळ pudhari photo
जालना

Jalna civic health system : शहराच्या आरोग्य व्यवस्थेला पालिकेचे बळ

जालन्यात सात नव्या शहरी आरोग्य केंद्रांची भर, 17 केंद्रे भाड्याच्या इमारतीत, 15 व्या वित्त आयोगातून तरतूद

पुढारी वृत्तसेवा

जालना ः सातत्याने शहराची लोकसंख्या विस्तारत आहे. आरोग्याविषयक लोकांच्या गरजा वाढत आहे. यामुळे नव्याने झालेल्या जालना शहर महापालिकेने शहराच्या आरोग्य व्यवस्थेला बळ देण्याचे काम केले आहे. पूर्वी अस्तित्वात असलेली 12 आणि नव्याने भर पडलेल्या 7 अशी एकूण 19 शहर आरोग्य केंद्र कार्यान्वित झाली आहे.

दरम्यान, जालना शहर महापालिका स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जालना महापालिकेने सात नव्या शहरी आरोग्य केंद्रांची सुरुवात केली असून, त्यामुळे शहरात एकूण 19 शहरी आरोग्य केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. मात्र, यापैकी तब्बल 17 आरोग्य केंद्रांसाठी भाडेतत्त्वावर इमारती घ्याव्या लागल्या आहेत. महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर नागरिकांना आरोग्य, स्वच्छता व इतर नागरी सुविधा पुरवणे आवश्यक असते.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील विविध भागांत शहरी आरोग्य केंद्रे सुरू करण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. मात्र, जागा व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर महापालिकेने सात ठिकाणी नव्याने शहरी आरोग्य केंद्रे सुरू करून हा रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे.

शहरी केंद्राअंतर्गत आरोग्यसेवा, बाह्यरुग्ण तपासणी, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रम, शासनाकडून वेळोवेळी राबवले जाणारे शालेय लसीकरण, पल्स पोलिओ, डायरिया कंट्रोल प्रोग्राम, जंतनाशक गोळ्यांचे वाटप आदींसह आरोग्य विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते.

महापालिकेच्या शहरी आरोग्य केंद्राबरोबर तीन ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पाणीवेस, रामनगर आणि नूतन वसाहत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही ढोरपुरा येथे कार्यरत आहे.

दरम्यान, ही सर्व शहरी आरोग्य केंद्रे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू करण्यात आली असून, यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार आहे. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांची गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

या ठिकाणी आहेत शहरी आरोग्य केंद्र

मुर्गी तलाव व खाडक तलाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत शहरी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर दुःखीनगर, माउलीनगर एक व दोन, चंदझिरा, संजयनगर, ढवळेश्वर, नॅशनल नगर, काद्राबाद, सरस्वती मंदिर परिसर, शकुंतलानगर, हनुमान घाट, कन्हैयानगर, न्यू एमआयडीसी, नवीन मोंढा व राहुलनगर या भागांत भाडेतत्त्वावर जागा घेऊन शहरी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT