जालना: जालना शहर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. मनपा आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या थेट आदेशानुसार मंठा चौफुली परिसरात 'अतिक्रमण हटाव' मोहिमेचा तीव्र धडाका लावला गेला. या धडक मोहिमेत मंठा चौफुली ते न्हावा रोड या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंची एकूण १४७ अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसराने सुटकेचा श्वास घेतला आहे.
सदर मोहीम उपायुक्त त्र्यंबक कांबळे आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोख नियोजन करून पार पाडण्यात आली. मंठा चौफुली परिसरात वाढलेल्या टपऱ्या, शेड आणि इतर कच्च्या-पक्क्या बांधकांमांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.
ही कोंडी फोडण्यासाठी मनपाने २ जेसीबी आणि ४ टिप्परच्या साह्याने सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवून रस्ता मोकळा केला. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने चोख चोख बजावत मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण जालना शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही नियमितपणे आणि सातत्याने सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्वखर्चाने अतिक्रमण काढा; अन्यथा कारवाई!- "शहरातील रस्ते, चौक तसेच सार्वजनिक नाली व नाल्यांवर केलेले अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आणि स्वखर्चाने काढून प्रशासनास सहकार्य करावे. महापालिकेने जागा मोकळी केल्यानंतर संबंधित ठिकाणी पुन्हा कोणी अतिक्रमण केल्यास, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."विजय फुलंब्रीकर, सहाय्यक आयुक्त, जालना शहर महानगरपालिका