जालना : राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच जालना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने करताच, नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यासोबतच आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 65 जागा असून त्यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत. शहरात 16 प्रभाग रचना करण्यात आली असून याच प्रभागांतून 65 नगरसेवक निवडून येणार आहेत.
महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस युतीत उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नसून, आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याचे चित्र आहे. महायुती होणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार, याकडे आता जालना शहराचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेत भाजपाचा स्वबळाचा नारा
जालना जिल्ह्यात नुकत्याच तीन नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपाने तीन्ही नगर पालिकेत स्वबळाचा नारा दिला होता. तर अंबड नगरपालिकेत महाविकास आघाडीतल घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली. आता जालना महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेत असलेला भाजपा, शिंदे सेना आणि राकाँ अजित पवार गट स्थानिक पातळीवर स्वबळ आजमावताय की घटक पक्षांना सोबत घेऊन महापालिकेवर झेंड रोवतोय, हा येणारा काळच ठरवणार आहे.
शिंदे सेना - राकाँ यांची युती
चंदनझिरा येथे झालेल्या पक्ष कार्यक्रमात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी जर भाजपा सोबत आली तर ठीक नाहीतर आमची युती शिंदे सेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत निश्चित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राकाँ. अजित पवार गटानेही पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.
महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे
जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूर जुळले नाही. महाविकास आघाडीची दिशाही अस्पष्ट असल्याचे दिसून आले. त्यामुळे जालना शहर महापालिकेत महाविकास आघाडीचे सूर जुळतात की विस्कटतात लवकरच स्पष्ट होणार आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात काँग्रेसला म्हणावे तसे बळ उरले नाही. तर उबाठाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर हे देखील शिंदे सेनेत गेल्याने शिंदे सेनेची ताकद वाढली आहे. उबाठालाही म्हणावा तसा चेहरा उरला नाही. त्यामुळे महापालिकेत कोण सत्ता गाजवतोय ते 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
जालना शहरातील 16 प्रभागनिहाय आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक. 1 : अ. अनु.जाती, ब. ओबीसी महिला, क. ओबीसी महिला, ड. सर्वसाधारण महिला, इ. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 2 : अ. अनु. जाती महिला, ब. ओबीसी महिला, क. सर्वसाधारण, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 3 : : अ. अनु.जाती, ब. अनु जमाती महिला, क. ओबीसी, ड. सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक 4 : अ. अनु. जाती महिला, ब. ओबीसी, क. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 5 :अ. ओबीसी, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 6 : अ. ओबीसी महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 7 : अ. ओबीसी, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8 : अ. ओबीसी महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9: अ. ओबीसी महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 10 : अ. ओबीसी, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11 : अ. ओबीसी, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 12: अ. अनु.जाती, व. ओबीसी महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 13 : अ. ओबीसी महिला, ब. सर्वसाधारण महिला, क. सर्वसाधारण, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 14 : अ.अनु.जाती महिला, ब. ओबीसी, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15: अ.अनु. जाती महिला, ब.ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 16: अ. अनु.जाती, ब.ओबीसी महिला, क. सर्वसाधारण महिला, ड. सर्वसाधारण
15 जानेवारीला मतदान,16 ला मतमोजणी
नामनिर्देशन पत्र ऑफलाइन पद्धतीने भरावयाचे असून त्याची मुदत दि. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर.
नामनिर्देशन पत्रांची तपासणी : दि. 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दि. 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी 3 जानेवारी 2026 रोजी
मतदानाचा दिवस : दि. 15 जानेवारी 2026
मतमोजणी : दि. 16 जानेवारी 2026