जालना महानगरपालिका pudhari photo
जालना

Jalna News : समाज मंदिर, ओपन स्पेसचा ताबा घेण्याचे मनपापुढे आव्हान

अतिक्रमण मुक्तीसाठी पदाधिकाऱ्यांसह प्रभारी आयुक्तांची कसरत

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना महानगरपालिका हद्दीतील विविध वसाहतींमध्ये असलेल्या समाज मंदिर व ओपन स्पेसच्या जागांचा अधिकृत ताबा महानगरपालिकेकडे नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सार्वजनिक हिताच्या या जागांची मालकी नोंद अद्याप पूर्ण न झाल्याने भविष्यात अतिक्रमण, वाद आणि अनधिकृत वापर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कन्हैयानगर, वेंकटेश नगर, भवानीनगर, सम्म्राट नगर, लालबाग, रामनगर आदी भागांमध्ये अनेक समाज मंदिर व खुल्या जागा अस्तित्वात आहेत. या ठिकाणी काही समाज मंदिरांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होऊन कामे पूर्ण झाली असतानाही संबंधित जागांचा अधिकृत ताबा आणि नोंद प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुढे आली आहे.

या जागांवर स्पष्ट सीमांकन, मोजणी आणि फलक लावले नसल्यामुळे अतिक्रमणाची शक्यता वाढत आहे. भविष्यात सार्वजनिक मालमत्ता वादग्रस्त ठरण्यापूर्वी महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

या भागात आहेत मोकळ्या जागा

कन्हैयानगर (२), हनुमान घाट (१), लालबाग (१), मोदीखाना (२), रामनगर (२), वेंकटेश नगर (४), शकुंतला नगर (२), जेटमल नगर (१), संभाजीनगर (२), भवानीनगर (४), संजय नगर (१), चंदनझिरा (२), मिलतनगर (२), सम्राट नगर (३), खरात नगर (३), शंकरनगर (२), संतोषी माता कॉलनी (२), कडवीमंडी (१), गवळीपुरा (२), खडकपूर (१), कादराबाद (२), मंगळबाजार (३), भिकारी गल्ली (१), लोदीमौला (१), मस्तगड (१), लक्ष्मीनारायणपुरा (२), डबल जीन (१) इत्यादी ठिकाणी एकूण मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस व समाज मंदिरांची जागा अस्तित्वात आहे.

सदर जागांची तत्काळ नोंद, मोजणी, सीमांकन करण्यात यावे. यासाठी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात आले आहे. कारवाई करण्यात येत आहे, केवळ अशी माहिती देण्यात येत आहे.
गणेश लुटे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT