जालना : जालना महानगरपालिकेच्या नवनियुक्त लोकप्रतिनिधींच्या पहिल्या स्थायी समिती बैठकीत आगामी वर्षासाठी 463 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवार, दि. 24 रोजी सादर करण्यात आला. मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी हा अर्थसंकल्प मांडला. स्थायी समिती सभापती अशोक ऊर्फ लक्ष्मीकांत पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्पन्न वाढीसाठी कडक उपाययोजना, शहर विकास आणि सौंदर्यीकरणावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस आयुक्त आशिमा मित्तल यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी कर वसुली वाढविणे, मालमत्तांचे फेरसर्वेक्षण आणि भाडे वाढ यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. ‘पुणे महानगरपालिका’च्या धर्तीवर कडक वसुली राबवण्याचीही सूचना सदस्यांनी केली.
शहरातील अतिक्रमण, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले. डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनद्वारे फॉगिंग करण्यासाठी निधी वाढवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. तसेच स्वच्छता व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी व आयडी प्रणाली सक्तीची करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात मनपा शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी निधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळांना ‘सेमी इंग्लिश’ करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. पर्यावरणपूरक धोरणांतर्गत भविष्यातील वाहन खरेदी इलेक्ट्रिक स्वरूपात करण्याची सूचना करण्यात आली.
पर्यटन वाढीसाठी मोती तलाव परिसरात पिकनिक स्पॉट उभारण्याची संकल्पना पुढे आली असून, सोलार प्रकल्प आणि बोटिंगसारख्या उपक्रमांमधून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला. सूचनांनुसार आवश्यक बदल करून हा अर्थसंकल्प लवकरच महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
‘पुणे पॅटर्न’ ठरणार का गेमचेंजर?
जालना महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ‘पुणे पॅटर्न’ने कर वसुलीचा मुद्दा विशेष ठरला आहे. मालमत्ता कर थकबाकी, भाडे वसुली आणि परवाना नूतनीकरणात कडक अंमलबजावणी केल्यास मनपाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्याचबरोबर ड्रोन फॉगिंग, ट्रॅकिंग, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर यांसारख्या आधुनिक उपाययोजना शहराला ‘हायटेक’ बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतात. मात्र, या योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात, यावरच अर्थसंकल्पाचे यश अवलंबून राहणार आहे.
उत्पन्न वाढीसाठी कडक वसुली आणि ‘पुणे पॅटर्न’चा प्रस्ताव
मालमत्ता फेरसर्वेक्षण व भाडेवाढीवर भर
अनधिकृत होर्डिंग्ज व अतिक्रमणाविरुद्ध कारवाईचे संकेत
डास नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे फॉगिंगचा प्रस्ताव
स्वच्छता व्यवस्थेसाठी आणि आयडी प्रणाली सक्तीची
मनपा शाळांना ‘सेमी इंग्लिश’ करण्याचा मानस
पर्यटन वाढीसाठी मोती तलाव परिसरात पिकनिक स्पॉट योजना