Jalna ST bus service pudhari photo
जालना

Jalna ST bus service : प्रवासी नसलेल्या मार्गावरील बस फेऱ्या होणार बंद !

ग्रामीण भागाला फटका बसण्याची शक्यता, व्‍यावसायिकतेकडे एसटीची वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

जालना : एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्याच्या दिशेने पावले टाकली असून भाडे वाढीनंतरही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्यामुळे आता ‘जिथे अधिक प्रवासी, तिथे अधिक गाड्या’ या तत्त्वावर वाहतूक नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी भारमान नसलेल्या एसटी फेऱ्या लवकरच बंद करून भारमान असलेल्या रूटवर वळवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसणार आहे.

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली एसटी आता व्यावसायिक भूमिका घेऊन काम करणार आहे. एसटीच्या स्थानक-आगारापासून १५० किलोमीटरच्या परिसरात तब्बल ९५.४७ टक्के प्रवासी असताना या अंतरात केवळ ५०.४६ टक्के फेऱ्या चालवल्या जात असल्याचे महामंडळाच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या भागात शटल फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

एसटीचा आतापर्यंतचा कल मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या फेऱ्यांकडे राहिला. मात्र, प्रवाशांची वास्तविक गरज आणि उपलब्ध फेऱ्यांमध्ये तफावत असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना काळी-पिवळीसारख्या अनधिकृत वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्या वाहतूक धोरणात प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन केले जाणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून दर महिन्याला निधी द्यावा लागत आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जवळपास १४ टक्के सरसकट भाडेवाढ करण्यात आली. मात्र, भाडेवाढीनंतरही जुलैचा पगार सरकारकडून निधी मिळाल्यानंतरच करता आला. त्यामुळे एसटीच्या वाहतूक व्यवस्थेत धोरणात्मक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लांबपल्ल्याच्या एसटीत कमी प्रवासी

  • एसटीच्या वाहतूक विभागाने केलेल्या अभ्यासानुसार, स्थानिक-आगारापासून १५० किलोमीटरच्या अंतरात ९५.४७ टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यासाठी महामंडळाच्या एकूण फेऱ्यांपैकी केवळ ५०.४६ टक्के फेऱ्या चालवल्या जातात. याउलट १५० ते २५० किलोमीटरच्या अंतरात केवळ ३.३३ टक्के प्रवासी असताना १९.७५ टक्के फेऱ्या चालवल्या जातात. तर २५० किलो मीटरहून अधिक अंतरासाठी केवळ १.१६ टक्के प्रवासी असताना तब्बल २९.७९ टक्के फेऱ्या चालवल्या जातात.

  • परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अपेक्षित प्रवासी संख्येविना धावत असल्याचे चित्र आहे. २०१९ पूर्वी एसटीचा भर शटल फेऱ्यांवर अधिक होता. कोरोनानंतर वाहतूक व्यवस्थेत परिस्थितीनुसार बदल झाले. आता पुन्हा त्याच धर्तीवर शटल सेवांना प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT