जालना ः जालना शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या मोती बाग तलावात तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून जालन्यातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर याच पार्श्वभूमीवर अखेर बुधवार, दि. 1 रोजी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल, स्मारक समितीचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे आदींनी संयुक्त स्थळ पाहणी केली. जागेची लवकरच निश्चिती होणार असून, कामाला गती मिळणार आहे.
दरम्यान, या पाहणीमुळे नागरिकांच्या मागणीला सकारात्मक दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले. मोती बाग तलाव हा जालना शहरातील एक प्रमुख आणि आकर्षक परिसर मानला जातो. या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्यात आल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच हे ठिकाण धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
गेल्या काही काळापासून जालन्यातील अनेक नागरिक आणि बौद्ध समाजातील प्रतिनिधी यांनी मोती बाग तलाव परिसरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्याची मागणी जोर धरली होती. शहरातील शांतता, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे प्रतीक म्हणून ही मूर्ती उभारण्यात यावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने विविध वेळा प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्याने या प्रकल्पाला आता अधिकृत गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज झालेल्या स्थळ पाहणीनंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहेे. मोतीबाग तलाव परिसरात गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्यात आल्यास जालना शहराला एक नवीन ओळख मिळणार आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळेस या परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी हे ठिकाण अधिक आकर्षक आणि प्रेरणादायी ठरेल. तसेच युवक, पर्यटक आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठीही हे एक महत्त्वाचे आकर्षण ठरू शकते. यावेळी शहर अभियंता सय्यद सऊद, कनिष्ठ लिपिक आनंद अंभोरे, वास्तुविशारद बनसोड, स्मारक समितीचे सदस्य धर्मा खिल्लारे आदींसह महानगर पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आज गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या उभारणीसंदर्भात स्थळाची पाहणी करण्यात आली. या कामासाठी आवश्यक असलेला आणि प्रशासकीय पाठपुरावा प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. या स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.वंदना मगरे,महापौर, जालना.