

मुंबई ः सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2,869 जागांसाठी गुरुवारी (दि. 15) सुरासरी 56 टक्के मतदान झाले असून, एकूण 15,908 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहे. या माध्यमातून 2 हजार 869 विजयी उमेदवार गुलाल उडविणार आहेत. मतदानासाठी शाईवरून झालेला वादंग, गोळीबार, पक्ष कार्यालयाची जाळपोळ, ‘ईव्हीएम’ची तोडफोड यासारख्या घटना वगळता मतदान सर्वसाधारणपणे शांततेत पार पडले. शुक्रवारी (दि. 16) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, निकालांबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला असला, तरी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे चित्र आहे. राज्यात काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाला उशिरा सुरुवात झाली, त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.
मुंबईतील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
विशेष म्हणजे, राज्यातील जनतेचे मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिंदे शिवसेनेने या महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईत या दोन्ही पक्षांची युती असली, तरी महापौरपदावरून त्यांच्यात ‘काँटे की टक्कर’ आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे मुंबईतील लढतीत रंग भरले होते. शिवसेना ‘उबाठा’ आणि मनसेने मराठीचा मुद्दा शिखरावर नेला होता; तर ऐनवेळी काँग्रेसने सोडलेल्या 16 जागांवर ‘वंचित’ने उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे मतदारांचा कल कोणत्या बाजूने होता, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
महायुतीमधील जागावाटपात शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेने भाजप वरचढ आहे. मात्र, 29 महापालिकांमधील विजयी नगरसेवकांच्या संख्येवरून या दोन प्रमुख पक्षांपैकी नंबर 1 कोण ठरेल, याविषयीची उत्सुकता मतदानाच्या टक्केवारीने शिगेवर पोहोचवली आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराची सूत्रे आपल्याकडे घेतली होती. मात्र, महानगरपालिकांचे काही वॉर्ड/प्रभागांचा अपवाद वगळता स्टार प्रचारकांना कुठेही फिरू दिले नाही. त्यामुळे मतदानाच्या आकेवारीवरून भाजप, शिंदे सेना, शिवसेना ‘उबाठा’, मनसे आणि काँग्रेस नेत्यांच्या लोकप्रियतेचाही निकाल आज लागणार आहे. जनतेकडून मिळालेल्या पोच पावतीवरून जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचाराची रणनीती ठरेल, असेही बोलले जात आहे.
शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई (इंक) सहजासहजी पुसली जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शाई जर पुसली जात असेल, तर पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उभे राहते, असे म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला. तसेच, शाई नव्हे तर लोकशाही पुसली जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. मतदानासाठी वापरली जाणारी शाई ही गुणवत्तापूर्ण असून, ती सहजासहजी निघणारी नाही. नागरिकांनी शाईबाबत कोणताही संभ्रम मनात ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.