अवैध वाळूच्या धंद्यात पोलिसांचे हात ओले pudhari photo
जालना

Jalna sand mafia bribery case : अवैध वाळूच्या धंद्यात पोलिसांचे हात ओले

मंठ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची अंमलदारावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मंठा ः जालना जिल्ह्यात अवैध वाळूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांचे हात ओले करून या व्यवसायात वाळूमाफिया व पोलिस प्रशासनातील काही जण गब्बर होताना दिसत आहेत. मंठा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 12) सायंकाळी यशस्वी सापळा कारवाई करत पोलिस अमलदारावर लाच घेतल्याच्या आरोपावरून कारवाई केली. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.

मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार रवी गणपत जाधव यांना वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 38 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता मागण्यात आला होता. त्यातील 10 हजार रुपये आधी घेऊन उर्वरित 40 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते.

मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.त्यानुसार 12 मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी पोलिस अमलदाराने हप्त्याचे 50 हजार रुपये तसेच स्वतःसाठी 5 हजार रुपये अशी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनीही आरोपीला ही रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. यानंतर सापळा रचण्यात आला.

तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून मंठा पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत ही रक्कम स्वीकारताना सापळा पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी रवी जाधव याच्या अंगझडतीत 30 हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून दुसऱ्या आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेऊन तपासासाठी पाठविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर करत आहेत.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईस पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि पोलिस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

  • जालना जिल्ह्यात अवैध वाळूचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे.काही ठिकाणी पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद अवैध वाळू व्यवसायाला असल्याची चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात विना नंबरच्या हायवा व ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसत असतानाच बोटावर मोजण्याएवढ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत आहे.अवैध वाळूवर कारवाई ही केवळ दिखाव्यापुरतीच असल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT