जालना : शहरातील कदीम जालना परिसरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी ‘वॉशरूमला जाते’ असे सांगून घराबाहेर पडली; मात्र त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र श्रीकृष्ण पाठक (वय 50, व्यवसाय शेती, रा. कसबा गांधीचमन, जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 17 वर्षीय मुलगी सोमवार, दि. 6 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मी वॉशरूमला जाते असे सांगून ती घरातून निघून गेली; मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत आली नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, पाठक कुटुंबीयांनी जालना शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. तिच्या मैत्रिणींशीही संपर्क साधून माहिती घेतली; मात्र कुठेही ठावठिकाणा लागला नाही. यामुळे अज्ञात इसमाने ुफूस लावून तिला पळवून नेले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
हरवलेल्या अक्षराचे वर्णन असे की, तिने काळ्या रंगाचा टॉप व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. पायात चप्पल असून केस लांब आहेत. या घटनेची नोंद कदीम जालना पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.