Jamkhed Dhangar Reservation Protest
जामखेड: जालना येथे दीपक बोराडे यांचे एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास सुरू असतानाच आज (दि.२७) जामखेड येथील धनगर समाज बांधव धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी जामखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. यावेळी आंदोलक भगवान भोजने यांना त्यांचे बंधू संभाजी भोजने समजावत असताना ते स्वतः चक्कर येऊन पडले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
दीपक बोराडे यांचे धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू असतानाच जामखेड (ता. अंबड) येथील भगवान भोजने, देवलाल मंडलिक, भगवान आबा भोजने हे तीन धनगर बांधव दहा वाजेपासून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहे. धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी नाही झाली तर या आंदोलकांनी आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला आहे.
यावेळी समाज बांधवांच्या वतीने यळकोट येळकोट 'जय मल्हार , धनगर एस.टी आरक्षण अंबलबजावणी झालीच पाहिजे , धनगर एकजुटीचा' विजय असो, अशा घोषणा देत आहेत. जामखेड येथील शेकडो धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आंदोलन पाण्याच्या टाकी वरती भर पावसात सुरू असून अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेला नाही.