मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मजीद Pudhari
जालना

Jalna Crime | जाफराबादमध्ये बुलेट चोरट्यांचा पाठलाग जीवावर बेतला; मिरची व्यापारी शेख मोहसीन यांचा निर्घृण खून, पुतण्या गंभीर जखमी

जाफराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे

पुढारी वृत्तसेवा

Bullet Thieves Attack Mirchi Merchant Jafrabad

जाफराबाद : जाफराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मजीद (वय ४६) यांचा आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला. या हल्ल्यात त्यांचा पुतण्या शेख साहिल शेख मोबिन (वय २२) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २६) मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास जाफराबाद शहरातील सिद्धार्थ नगर, चिखली रोड परिसरातील घरासमोर उभी असलेली बुलेट दुचाकी काही चोरटे चोरी करून घेऊन जात होते. ही बाब लक्षात येताच वाहन मालक शेख मोहसीन यांनी तत्काळ आपल्या पुतण्या शेख साहिल यांच्यासह चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.

चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात शेख मोहसीन यांनी आरोपींना गाठले असता चोरट्यांनी स्वतःजवळील धारदार शस्त्र बाहेर काढून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी शेख मोहसीन यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर तसेच डाव्या दंडावर तब्बल सात वार केल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेख मोहसीन यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख साहिल यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मृत शेख मोहसीन हे जाफराबाद येथील न्यू हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शेख मोबिन यांचे लहान बंधू होत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे जाफराबाद शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापारी व सामाजिक क्षेत्रातूनही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT