Jalna electricity consumption pudhari photo
जालना

Jalna electricity consumption : वीज वापरात औद्योगिक क्षेत्र आघाडीवर; कृषी दुसऱ्या स्‍थानी

जालना जिल्ह्यात वीजेचा एकूण वापर ४३८६.३२७ दशलक्ष युनिट्स

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील वीज वापराच्या आकडेवारीत औद्योगिक क्षेत्र सर्वाधिक वीज वापरणारे क्षेत्र ठरले आहे. जिल्ह्यात एकूण ४३८६.३२७ दशलक्ष किलोवॅट तास वीज वापर नोंदविण्यात आला असून, त्यापैकी ३५७३.६२४ दशलक्ष किलोवॅट तास वीज एकट्या औद्योगिक क्षेत्राने वापरली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण वीज वापरात उद्योग क्षेत्राचा सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घरगुती ग्राहकांनी १३८.६१९ दशलक्ष किलोवॅट तास, तर व्यावसायिक क्षेत्राने ३५.७५१ दशलक्ष किलोवॅट तास वीज वापरली आहे. कृषी क्षेत्रातील वीज वापर ५८३.७३१ दशलक्ष किलोवॅट तास इतका असून, सिंचनासाठी आणि शेतीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात वीजेचा वापर होत असल्याचे दिसून येते. रेल्वे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती आदी अन्य विभागांचा वीज वापर ५४.६०२ दशलक्ष किलोवॅट तास इतका नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक वाढ, शेतीतील विजेवरील अवलंबित्व आणि वाढती नागरीकरणाची प्रक्रिया यामुळे वीजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, वीजेवरील कृषी पंपाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविल्या जाते. या योजनेच्या माध्यमातून जिल्हाभरात सुमारे ४५ हजार ७९८ शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात कृषी पंपांची संख्या

जालना जिल्ह्यात एकूण १२७.७७ हजार म्हणजेच १ लाख २७ हजार ७७० कृषी पंप संच कार्यरत आहेत. शेती सिंचनासाठी विजेवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व आहे. कृषी क्षेत्रातील वीज वापर सुमारे ५८३.७३१ दशलक्ष किलोवॅट तास इतका आहे. जिल्ह्यातील १.२७ लाखांहून अधिक कृषी पंपांमुळे शेती क्षेत्रात विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी सोलार कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अवलंबित्व काही अंशी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

विजेचा वापर (दशलक्ष किलोवॅट तास)

  • क्षेत्र - वीज वापर

  • घरगुती -१३८.६१९

  • व्यावसायिक- ३५.७५१

  • औद्योगिक- ३५७३.६२४

  • कृषी- ५८३.७३१

  • इतर- (रेल्वे, सार्वजनिक पाणीपुरवठा,सार्वजनिक दिवाबत्ती आदी) ५४.६०२

  • एकूण ४३८६.३२७

तालुकानिहाय सौरपंप

  • जालना ग्रामीण -८१४७

  • भोकरदन -७७२६

  • घनसावंगी -७५०८

  • जाफराबाद - ६१७६

  • अंबड -५३९५

  • परतूर -४९७९

  • बदनापूर -३५४१

  • मंठा -२३२६

SCROLL FOR NEXT