Jalna Implement ST reservation
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गातून आरक्षण तत्काळ लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयांसमोर तीव्र आंदोलने व निदर्शने करण्यात आली. शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनानंतर 'जय मल्हार, जय अहिल्या'च्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमला गेला.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भोकरदन तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने धडक देऊन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले की, धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करून धनगर आरक्षण संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्णय प्रतिकूल झाल्यास शासनाने समाजासाठी ठोस 'प्लॅन-बी' तयार ठेवावा आणि समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावी कायदेशीर व प्रशासकीय पावले उचलावीत. श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र शासकीय कायदा ठेवावा.
देवस्थानच्या २१ विश्वस्तांपैकी किमान ११ विश्वस्त अस्सल मेंढपाळ समाजातील असावेत तसेच देवस्थानचे अध्यक्षपदही मेंढपाळ समाजातील व्यक्तीस देण्यात यावे. मिसिंग लिंकला 'वीर सिंगरोबा धनगर' नाव: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला समाजाचे आराध्य दैवत व इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व 'वीर सिंगरोबा धनगर' यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृतीचा सन्मान करावा. चर्चगेट स्थानकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे. शासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
यावेळी विजय मतकर, गणेश बोराडे, ज्ञानेश्वर सोरमारे, शंकर सपकाळ, कारभारी आदवाने, रमेश घनवट, भगवान घनवट, गणेश बोराडे, शंकर साळवे, सचिन घनवट, आकाश घनवट, सुनील बोराडे, धोंडीराम भानुरे, आदिनाथ बोराडे, विजय थिटे, गजानन भालोटे, दयाल बोराडे, विशाल घनवट, राजू घनवट, भगवान बोराडे, शालिग्राम बोराडे, श्रीकांत जुमडे, राजू भालोरे, अशोक घनवट, विजय भालोरे, सतीश घनवट, महादू घनवट, अंकुश बनसोडे, प्रकाश हांडगे यांच्यासह सकल धनगर समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.