जालना : शहरातील नियमबाह्य चिकन विक्रीला आळा घालण्यासाठी जालना महापालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. मंठा नाका रोड व खरपुडी रोड परिसरात रविवार, (दि. २३) रोजी करण्यात आलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करून चिकन विक्री करणारी तीन दुकाने सील करण्यात आली, तर तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांनी महापालिकेच्या नियमांचे पालन करावे, स्वच्छता राखावी तसेच आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता करावी, यासाठी महापालिकेकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत मंठा नाका रोड आणि खरपुडी रोड परिसरातील चिकन विक्रीच्या दुकानांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलेल्या तीन दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य तीन दुकानांवर दंड ठोठावण्यात आला.
महापालिकेच्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढेही शहरातील चिकन-मटण विक्री केंद्रांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कारवाईत यांचा सहभाग
उपायुक्त त्रिंबक कांबळे व सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चिकन-मटण विभागाचे प्रमुख मोहम्मद अमजद खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. या पथकात मुकेश गायकवाड, रामेश्वर जाधव, राहुल जाधव, राधेश्याम लोखंडे, राहुल लोखंडे, विक्रांत किर, सचिन ढवळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.