jalna husband beating death parents sp office protest
जालना, पुढारी वृत्तसेवाः साहेब, माझ्या पतीचे नराधमांनी पाय तोडले हो. त्यांना हालहाल करून मारले. माझ्या पतीकडे पैसे असतील तर मी दिले असते. त्यांनी माझ्या लेकराला अनाथ केले. त्या आरोपींना सोडू नका, मला न्याय द्या, असा टाहो मयताची पत्नी आशा तुरे यांनी फोडला.
बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या लखन तुरे या तरुणाच्या नातेवाईकांनी सोमवार, दि.७ रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात प्रेत आणून आपला आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांच्या हद्दीत लखन छगनलाल तुरे (वय ३७ रा. संभाजीनगर) यांनी राहूल कंठाले याच्याकडून व्याजाने पैशे घेतले होते.
शुक्रवार, दि. ४ रोजी रात्री याच पैशांच्या कारणावरुन राहूल कंठाले रा. संभाजीनगर आणि नवनाथ जोगदंड रा. ढवळेश्वर, जालना यांच्यासह अन्य दोन जणांनी लखन तुरे यांना दगडाने आणि रॉडने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी शनिवार, दि. ५ रोजी संशयित आरोपी नवनाथ जोगदंड आणि राहुल कंठाले यांना अटक केली.
अन्न दोघे फरार झाली. याच दरम्यान सोमवार, दि. ७ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान लखन तुरे यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रुग्णवाहिकेतून आणला. जो पर्यंत फरार दोन आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला.
त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक तेघबिर सिंग संधू यांच्याशी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. एसपी तेघबिर सिंग संधू यांनी फरार आरोर्पीना लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधीकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह लखन तुरे यांची पत्नी आशा तुरे, मयताचा भाऊ, वडील छगनलाल तुरे, काकू आर्दी नातेवाईकांसह समाजबांधव उपस्थित होते.
आरोपींना लवकर अटक करणार, एसपींची ग्वाही
मयताची पत्नी आशा तुरे यांनी आपल्या नातेवाईकांसह पोलीस अधीक्षक तेघबिर सिंग संधू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. पोलीस अधीक्षक तेघबिर सिंग संधू यांनी उर्वरित दोन आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे मयताची पत्नी आशा तुरे यांनी सांगितले.