जालना : तालुक्यातील जामवाडीसह परिसरात सोमवारी (दि. १५) रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. १६) पहाटे पाच वाजेपर्यत सुरू होता. जोरदार पावसामुळे जामवाडी तलाव ओव् हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मात्र सांडव्याचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झाले.
जामवाडीसह श्रीकृष्णनगर, पानशेंद्रा, गुंडेवाडी, धावेडी, थार, गोंदेगाव, उमद्र आदी भागांत जोरदार पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, मूग, तूर यांसह भाजीपाल्याचे पीक पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहेत. तसेच जामवाडी येथील लघुतलाव भरल्याने सांडव्याचे फुलेनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने जमीन खरडून गेली आहे. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जालना तालुक्यातील जामवाडीसह फुलेनगर भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला. याशिवाय जामवाडी येथील तलाव भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले. सांडव्याचे पाणी जास्त असल्याने फुलेनगर येथील रस्ता बंद झाला. तर जामवाडी येथील नदीवरून पाणी वाहत असल्याने रात्री दीड वाजेपासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा रस्ता बंद झाला होता.
जामवाडी येथील नदीवर नळकांडी पूल असल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास पुलावरून पाणी वाहते. यंदा तलाव भरल्याने नदी व सांडव्याचे पाणी वाहते. यामुळे पुलावरून पाणी लवकर ओसरत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार यांनी लक्ष घालून जामवाडी येथील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी जामवाडी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
मागील तीन वर्षांत जामवाडी शिवारात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलाव भरला नाही. यावर्षी मागील महिन्यापासून जोरदार पाऊस होत आहे. सोमवारी (दि.१५) रोजी रात्री झालेल्या पावसामुळे जामवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे या भागातील हजारो हेक्टरवरील क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.