जालना : जालना शहरासह जिल्ह्यात दररोज पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना मोठे पूर आले असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असतांनाच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य पाण्यात गेल्याने ग्रामस्थांसमोर खायचे काय अन् जगायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील सात मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी असताना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३ मिमी असताना जिल्ह्यात आजपर्यंत ७६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ९०७मिमी पाऊस पडला असुन त्या खालोखाल जालना ८०१, अंबड ७९६, बदनापूर ७८३, परतूर ७२३, जाफराबाद ७११, मंठा ७०५, भोकरदन ७२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत नसल्याने सततच्या पावसामुळे बाधित पिकांच्या क्षेत्रामधे वाढ होत आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीला मोठा पूर आल्याने पिठोरी सिरसगाव गावात पुराने वेढ दिला. अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले..
जुई नदीवरील पूल गेला वाहून भोकरदन तालुक्यातील आन्वा व आन्वा पाडा गावात जाणार जुई नदीवरील पूल जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या भाविकांसह विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहे. आन्वा परिसरात सोमवारपासून पडत असलेल्या जोरदार पावसाने जुई नदीला मोठा पूर आला होता. या पुरात नदीवरील पुलावर मोठे भगदाड पडले असून त्यामुळे आन्वा व आन्वा पाडा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहेत.
या ठिकाणी अतिवृष्टी
जालना जिल्ह्यात चोवीस तासांत परतूर तालुक्यातील सातोना मंडळात ६७, जालना शहर ६०, तीर्थपुरी ८६, कुंभार पिंपळगाव ८६, अंतरवाली ८६, घनसावंगी ६८.६, रांजणी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाले, ओढे खळाळून वाहत आहेत. शेतांचे तळे झाले असून पिके पाण्याखाली असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.