Jalna heavy rain crop damage
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जवळपास दोन हजार हेक्टरवरील खरिपाची पिके बाधित झाले आहेत. अतिवृष्टी व वीज पडल्याने जिल्ह्यात आजपर्यंत ३९ जनावरे मरण पावली आहेत. अनेक जुन्या घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. एका अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असतानाच दुसरी अतिवृष्टी होत असल्याने पंचनामे करण्याचे काम रखडत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीमध्ये २४ कोटींच्या अतिवृष्टी घोटाळा प्रकरणात २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ओढाताण सुरू झाली आहे. दुसरीकडे, पीक नुकसानीच्या प्राथमिक अहवालासंदर्भात महसूल विभागाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. जिल्ह्यात गत आठवड्यात परतूर, बदनापूर, अंबड, जालना आणि घनसावंगी तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये तळे साचले होते. त्यामुळे खरीप पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. मात्र, जिल्ह्यात गाजत असलेल्या अतिवृष्टी घोटाळ्यामुळे महसूल विभागात पीक नुकसान अहवालासंदर्भात सर्व काही अलबेल असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाकडे पीक नुकसानीचा प्राथमिक अहवालच आला नाही.
पीक नुकसान अहवालासाठी महसूल विभागाकडून चक्क नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याकडे बोट दाखवले जात आहे. पंचनामे सुरू आहेत, परंतु एकही अहवाल आलेला नाही, असे उत्तर महसूल विभागातून दिले जात आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ओढून ताणून होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. काढणीस आलेल्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने बदनापूर आणि परतूर तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाकडे आला आहे.
परंतु, ज्या अधिकाऱ्याकडे हा अहवाल आला त्याच अधिकाऱ्यावर अतिवृष्टी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाले. त्यामुळे हा अहवाल त्याच्या संगणकात कैद आहे. या अहवालानुसार बदनापूर तालुक्यातील नऊ गावांमधील ३७८ शेतकऱ्यांचे ४७० हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, परतूर तालुक्यातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवरील तूर, मूग, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३९ पशुधन दगावले असल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आहे.