पिंपळगाव रेणुकाई : बाजारात अद्रक (आले) दरांमध्ये मोठी तफावत आणि चढ-उतार पहायला मिळत आहेत. चांगल्या प्रतीच्या अद्रकाला आणि नवीन मालाला ३ हजार ते ३ हजार २०० प्रति क्विंटल इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने आले (अद्रक) उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आले लागवड केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील विहिरी आणि बोअरवेल्सनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी आल्याचे पीक पूर्णपणे वाढण्यापूर्वीच सुकू लागले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कच्चे आले काढून बाजारात विकावे लागत आहे.
पाणी असते तर हेच आले आणखी दोन महिने जमिनीत राहून त्याचे वजन आणि दर्जा वाढला असता व चांगला भाव मिळाला असता. परंतु सध्या पाण्याअभावी शेतकरी केवळ ३ हजार ते ३२०० रुपये प्रति क्विंटल या अत्यल्प दराने आले विकत आहेत. या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. बियाणे, खते, मजुरी आणि पाण्यासाठी केलेला खर्च लक्षात घेता शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या भीतीने ग्रासला आहे. शासनाने तात्काळ या भागातील आले उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत व पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या पाणीअभावी शेतकऱ्यांची अद्रक वळत असल्याने व कच्चामाल असल्यामुळे हा माल जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकरी पाण्याची अडचण लक्षात घेऊन माल शेतकरी विकत आहे. त्यामुळे शेतकरी याचे आर्थिक नुसकान होत आहे.
- संतोष बोर्डे, व्यापारी