जालना ः मानधनाच्या मागणीसाठी घंटागाडी चालकांनी महापालिकेला निवेदन सादर केले.  pudhari photo
जालना

Sanitation Workers Salary Issue : दोन दिवसांत वेतन न मिळाल्यास बुधवारपासून बेमुदत संपाचा इशारा!

घंटागाडी चालक संतप्त; उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहराचा कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य राखणाऱ्या घंटागाडी चालकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने संतप्त झालेल्या घंटागाडी चालकांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या दोन दिवसांत थकीत वेतन न मिळाल्यास, येत्या बुधवारपासून शहरात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा चालकांनी दिला आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले, घंटागाडी चालवण्याचे कंत्राट घेतलेल्या संबंधित एजन्सीजकडून चालकांचे पगार वेळेवर दिले जात नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक्सवेट एजन्सीकडे चालकांचा एका महिन्याचा, तर साई एजन्सीकडे तब्बल दोन महिन्यांचा पगार थकीत आहे. अशा प्रकारे एकूण तीन महिन्यांचे वेतन अडकल्यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

भर उन्हातानात, प्रतिकूल परिस्थितीत काम करूनही हक्काचा पगार मिळत नसल्याने चालकांचे जगणे असह्य झाले आहे. ‌‘तीन-तीन महिने पगार मिळाला नाही, तर आम्ही आमच्या मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? घरखर्च कसा चालवायचा आणि कुटुंब जगवायचे कसे?‌’ असा थेट आणि आर्त सवाल संतप्त चालकांनी प्रशासनाला विचारला आहे.

दिलेल्या निवेदनावर विजय भुरेवाल, नितीन दाभाडे, अक्षय भुरेवाल, सोनू खिल्लारे, बगु शेख, रमेश पाटोळे, विलास वायाळ, अनिल, गणेश, आकाश ढिलपे, पिंटू साबळे, आकाश, गणेश गायकवाड, दीपक कांबळे, रवी सराटे, अनिरुद्ध खंडागळे, सुनील किरण, सोहेल शेख, मुख्तार शेख, संदीप राजगिरे आदींच्या सह्या आहेत.

घंटागाडी चालकांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम

चालकांनी प्रशासनाला दोन दिवसांची अंतिम मुदत (अल्टिमेटम) दिली आहे. या कालावधीत संपूर्ण थकीत वेतन बँक खात्यात जमा न झाल्यास बुधवारपासून एकही घंटागाडी रस्त्यावर उतरणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. हा संप झाल्यास ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता यावर प्रशासन काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT